रोटीभोटा रोडवर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रोटीभोटा रोडवर १६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात १४ वर्षीय आदित्य महादेव बोंडे (रा. रोटी, ता. नांदुरा) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ट्रॅक्टर चालू असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. रस्त्यालगत असमतोल झाल्याने ट्रॅक्टर अचानक उलटला. यावेळी आदित्य हा ट्रॅक्टरच्या जवळ असल्याने उलटलेल्या ट्रॅक्टरखाली दबला गेला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत आदित्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
या घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.