भरोसा गावात दुर्घटना! ट्रॅक्टरच्या मल्चर मशीनमध्ये अडकून चिमुकलीचा मृत्यू...

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील भरोसा शिवारात रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत १३ वर्षीय मुलीचा मल्चर मशीनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत मुलीचे नाव पूजा रुमाल सिंग गौतम (वय १३) रा. भूरापाली, पोस्ट बोरी बुजुर्ग, ता. नेपानगर, जि. बुऱ्हानपूर, मध्य प्रदेश, सध्या मुक्काम भरोसा ता. चिखली, जि. बुलढाणा असे आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू सखाराम निराले (वय २८) हे आपल्या बहिणीसह व इतर मजुरांसोबत अशोक लिंबाजी थोटे यांच्या शेतात मका मोडण्याचे काम करत होते. दरम्यान, १२ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर पाणी पिण्यासाठी गेले असता पूजा ही दिसून आली नाही. शोध घेतला असता ती शेतात सुरू असलेल्या ट्रॅक्टरच्या मल्चर मशीनमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली.

घटनेनंतर तत्काळ ट्रॅक्टर बंद करून पूजाला बाहेर काढण्यात आले. मात्र, ती जागीच मृत
झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी फिर्यादीच्या अहवालावरून अंढेरा पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हे बीड जमदार करत आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अधिक तपास अंढेरा पोलीस करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतातील यंत्रसामग्री वापरताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे