मांडवा फाट्यावर भीषण अपघात : लोडिंग रिक्षाला दुचाकीची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू...
May 1, 2026, 12:32 IST
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील मांडवा फाट्यावरील टी-पॉइंट वळणावर गुरुवारी (दि. 30) सायंकाळी सुमारे 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. भरधाव वेगातील मोटारसायकलने लोडिंग रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून बीबी येथे लग्नासाठी आलेले रोशन नांदुरकर (वय 29) आणि शुभम पांडुरंग वंजाळे (वय 28, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) हे लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी परत जात होते. मलकापूर पांग्रा कडून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला त्यांच्या भरधाव (एमएच 27 बीएच 6276) दुचाकीने जोरदार धडक दिली.
या अपघातात रोशन नांदुरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शुभम वंजाळे याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, मलकापूर पांग्रा येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे हलवित असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, तसेच पोलीस कर्मचारी रवी चव्हाण, दिनेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही तातडीने धाव घेत मदतकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिकांचा संताप : दिशादर्शक फलक व गतिरोधकांची मागणी...
मलकापूर पांग्रा, बीबी तसेच दुसरबीड टी-पॉइंट परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक व गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.