धोंगर्डी पुलाजवळ युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; आरोपी झाल्टे फरार!
Nov 3, 2025, 10:33 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील धोंगर्डी पुलाजवळ १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात २८ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
झोडगा येथील प्रतीक दिलीप मोरे (वय २८) हा युवक काही कामानिमित्त धोंगर्डी फाट्याजवळ गेला असताना हरसोडा येथील ज्ञानेश्वर मुरलीधर झाल्टे (वय ३२) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद तीव्र झाल्याने झाल्टे याने संतापाच्या भरात प्रतीक मोरेवर धारदार कोयत्याने वार केले.
या हल्ल्यात प्रतीक मोरेच्या मान, कान व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून तो घटनास्थळीच कोसळला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.
हल्ल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर झाल्टे हा प्रतीक मोरेची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून “लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल,” अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.