पिंपळगाव राजात बांधकामादरम्यान भिंत कोसळली; दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू...

 
 पिंपळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अंगावर भिंत कोसळल्याने एक युवक व एक वृद्ध या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल २८ मे रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान पिंपळगाव राजा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार ठेकेदार अहमद खान यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. बांधकाम सुरू असताना अचानक एक भिंत कोसळली भिंत बांधकामावर असलेले मजूर मुकद्दर खान वय ८३ वर्ष व शेख युसुफ शेख बिस्मिल्ला वय ३६ वर्ष यांच्या अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना घडल्याचे लक्षात येताच ठेकेदार अहमद खान यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
ठाणेदार भागवत मुळीक व पोलीस तसेच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या दोन्ही मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र यातील शेख युसुफ शेख बिस्मिल्ला हे जागीच ठार झाले होते. तर मुकद्दर खान ह्यांना खामगांव सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुकद्दर खान हे ठेकेदार अहमद खान यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात २ मुले २ मुली पत्नी व नातवंडे आहेत. तसेच शेख युसुफ हे मावस जावई होते. युसुफ यांच्या पश्चात २ मुले पत्नी व भावंडं असा परिवार आहे.