४८ तासांचा थरारक पाठलाग! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानात जाउन दोन खंडणीखोरांना केले जेरबंद; अपहरण झालेल्या दाेन पीडितांची केली सुखरूप सुटका..! 

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ४८ तास अखंड प्रवास करत तब्बल १६०० कि.मी.चा थरारक पाठलाग करून दोन खंडणीखोरांना राजस्थानमध्ये जेरबंद केले. या कारवाईत अपहरण झालेल्या दाेघांना सुखरूप सोडवण्यात आले असून पिस्तूल, काडतूस आणि वाहनासह एकूण ५ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 फिर्यादी जयदीप नक्कु गिडा (रा. अडाजन, जि. सुरत, गुजरात) यांनी २२ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात सांगण्यात आले की, त्यांच्या कंपनीतील जयेश ऊर्फ जिराग आणि हिम्मतभाई यांचे अपहरण करून आरोपींनी २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीव घेण्याची धमकी देण्यात आली होती.
या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी या गंभीर गुन्ह्याच्या उकलासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनिल अंबुलकर यांना विशेष आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या विशेष पथकाने ४८ तास अविरत प्रयत्न करून आरोपींचा महाराष्ट्र, मध्यप्रदेश ते राजस्थान असा मागोवा घेतला.या दरम्यान मलकापूर, अकोला, अमरावती, परतवाडा, बैतूल, भोपाळ, नागट, आणि शेवटी कोटा (राजस्थान) येथे मोठ्या शिताफिने सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. त्यातून अपहरण झालेले जयेश चंद्रकांत दत्तानी (वय ४७, रा. गुजरात) आणि हिम्मतभाई पंडीया (वय ५२, रा. गुजरात) यांची सुखरूप सुटका करण्यात आली. पाेलिसांनी मोहम्मद जुनेद मोहम्मद इमरान (वय ३०, रा. अमरावती) व निहाल अहमद फिरोज अहमद (वय २६, रा. अमरावती) या खंडणीखाेरांना अटक केली.
त्यांच्याकडून पाेलिसांनी देशी बनावटीच्या २ पिस्तूल (किंमत ५० हजार), १ जिवंत काडतूस (किंमत १,०००/-), बेरना कंपनीची कार (किंमत पाच लाख) असा ५ लाख ५१ हजार रुपयांचा एवज जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर, पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. शेख चांद, पोकॉ. गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, ग्रे.पोउपनि. सुरेश रोकडे, पोकॉ. संतोष पेंढारकर, ईश्वर वाघ, सुरज चौधरी ,पोहेकॉ.राजू आडवे, पोकॉ.कैलास ठोंबरे,पबन मखमले, ऋषीकेश खंडेराव यांनी केली.