'बॉसच्या' बर्थडेला तलवारीने कापला केक ! आता भोगावे लागणार.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेड गावात एका अतिउत्साही तरुणाने स्वत: च्या वाढदिवशी तलवारीने केक कापला. स्वतः ला 'बॉस' समजून हतात तलवार मिरवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी बिबी पोलिसांना त्याला चांगला धडा शिकविला आहे. 
वैभव प्रल्हाद घुले (२० वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून २८ मे रोजी त्याचा वाढदिवस होता. यानिमित्ताने मित्रांनी केक कापण्यासाठी वैभवला आमंत्रित केले. गावातील रस्त्यावर मोटरसायकल उभी करून केक ठेवण्यात आला. केकवर बॉस असे लिहलेले होते. वैभवने तलवारीने केक कापून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला. हेच कृत्य त्याला चांगलेच महागात पडले. बिबी पोलिसांनी २९ मे रोजी वैभव घुले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अंमलदार अरुण सानप, यशवंत जैवाळ यांनी केली.