रेतीच्या टिप्परने घेतला पाच जणांचा जीव..! झोपलेल्या मजुरांच्या झोपडीवर खाली केले टिप्पर; रेतीखाली दबून मृत्यू; मायलेकींना गावकऱ्यांनी वाचवले; चांडोळ जवळची घटना..
Feb 22, 2025, 08:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चांडोळ गावाजवळ आज,२२ फेब्रुवारीच्या सकाळी भीषण अपघात झाला आहे. रेतीच्या टिप्परमुळे पाच मजुरांचा जीव गेला आहे. रेतीखाली दबल्याने पाच जणांचा मृत्यू झाला..
प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या पासोडा गावाजवळ एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाजवळ तात्पुरती झोपडी करून बांधकाम मजूर राहतात. आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास टिप्परने रेती आणली. पहाटेच्या अंधारात रेती खाली करतांना टिप्पर चालकाला खाली झोपडी असल्याचा अंदाज आला नाही. त्या झोपडीवरच रेती खाली झाल्याने झोपडीतील ७ जण ढिगार्याखाली दबले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली, त्यात दोघी मायलेकींना वाचवण्यात यश आले. मात्र ५ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी जाफ्राबाद पोलिसांनी धाव घेतली आहे. मृतक आणि जखमी मजूर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील आहेत...