निवडणुकीच्या मौसमात जळगाव जामोदातून पकडले एक पिस्तूल, १७ जिवंत काडतूस एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक.. 

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. २६ एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट तैनात आहे. या सगळ्या लगबगीत काल ८ एप्रिल रोजी जळगाव जामोद येथून एका जणाकडून एक पिस्तूल, १७ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. काल स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. 
  पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, जळगाव जामोद येथे खरेदी - विक्री च्या उद्देशाने एक जण पिस्तुल बाळगून होता. शेख जमीन शेख चांद असे या आरोपीचे नाव असून तो जळगाव जामोद तालुक्यातील खेड शिवार भागातील रहिवासी आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक गठीत केले. यशस्वी नियोजनातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून पिस्तूल, १७ जिवंत काडतूस, दोन मॅगझिन आणि एक मोबाईल फोन मिळाला. असा एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी शेख जमीन शेख चांद याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशाने, तर अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी. बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, डी. एस. गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. बुलढाणा, सपोनि. आशिष चेचरे, पोउपनि. श्रीकांत जिदमवार, पोहेकों, दिपक लेकुरवाळे, पोना. गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, पोकों, गजानन गोरले, मपोकों. आशा मोरे सर्व नेमणूक-स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे.