इन्स्टाग्रामवरील एका फोटोने पोहोचवलं थेट पोलीस ठाण्यात; १९ वर्षीय तरुण अटकेत..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इन्स्टाग्राम खात्यावर हातात धारदार शस्त्र घेऊन काढलेला फोटो प्रसारित करण्यात आला होता. सोशल मीडिया मॉनिटरिंगदरम्यान हा फोटो आढळून आल्यानंतर सायबर सेलने तपास सुरू केला. तपासात संबंधित इन्स्टाग्राम खाते तेलगू नगर येथील शेख शहबाज शेख रशीद (वय १९) याचे असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, मंगळवारी (दि. २८) राणी बगीचा परिसरातील एका फळविक्रीच्या दुकानातून पोलिसांनी शेख शहबाजला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित चाकू घरी असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून काळ्या रंगाच्या कव्हरमध्ये ठेवलेला चाकू जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या चाकूची एकूण लांबी ४०.५ सेंमी, तर पात्याची लांबी २७.५ सेंमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी शेख शहबाज शेख रशीद याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.