शेतातील मोटार केबल लंपास करणारा चाेरटा जेरबंद; भंगार दुकानदारालाही केली अटक; चिखली पाेलिसांची कारवाई!
दहा शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेलमधून एकूण १,३७५ फूट वायर चोरीस गेली होती . या प्रकरणी अभियानकुमार सहदेव निकाळजे यांनी ८ जुलै रोजी चिखली पोलिसात तक्रार दिली होती त्यावरून चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँचचे (डी.बी.) पोलिस उपनिरीक्षक समाधान वडणे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल अरुण इंगोले (रा. चिखली) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन अल्पवयीन बालकांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणातील चोरलेली वायर त्यांनी जाळून त्यातील तांब्याची तार चिखलीतील भंगार व्यापारी शेख अजीम शेख नजीर यास विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्या दुकानावर धाड टाकत १७ किलो ५०० ग्रॅम वजनाची तांब्याची तार, अंदाजे १७,५०० रुपयांची किंमत असलेला माल जप्त केला.पुढील तपास चिखली पाेलीस करीत आहेत.