शेगावात चाकूने खूपसा खूपशी! दोन ऑटो चालकांमध्ये सवाऱ्यावरून वाद पेटला! वाचवण्यासाठी आलेला भाऊ गंभीर, अकोल्याला हलवले..
May 2, 2025, 10:47 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन ऑटो चालकांमध्ये शेगावात सवाऱ्यांवरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एकाने दुसऱ्याला चाकूने खुपसून मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या भावावर देखील त्याने चाकूने वार केले. या हल्ल्यात ऑटो चालकाचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात विठ्ठल त्र्यंबक बुडकुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश श्रीराम बावस्कर (३०) यांचा ऑटो चालक म्हणून व्यवसाय आहे. नागझरी स्टॉप वर गणेश बावस्कर ऑटो चालवतात. ३० एप्रिलच्या मध्यरात्री (एक मे रोजी ,रात्री १ वाजता) गणेश बावस्कर यांनी गांधी चौकातून पाच सवाऱ्या घेतल्या व त्यांना विसावा स्टॉप वर सोडले. गणेश बावस्कर विसावा स्टॉप वर एका दुसऱ्या ऑटोचालकाशी बोलत असताना विठ्ठल बुडकुले नावाचा ऑटोचालक मोटर सायकलने गणेश बावस्कर यांच्या जवळ आला. "तू इथे काय करत आहे, इकडच्या सवाऱ्या का घेतल्या" असे म्हणत विठ्ठल आणि गणेश बावस्कर यांच्यासोबत शिवीगाळ करून वाद घातला. गणेश बावस्कर यांची कॉलर पकडली व खिशातून चाकू काढून गणेश बावस्कर यांच्या पोटात खूपसण्याचा प्रयत्न केला. बावस्कर यांनी हाताने चाकू अडवला, तरीदेखील चाकूचे टोक पोटाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. या झटापटीत गणेश बावस्कर यांनी त्यांच्या भावाला फोन केला, त्यावेळी देखील विठ्ठल ने पाठीमागून येत चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा वार बावस्कर यांच्या पाठीवर लागला.
जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत गणेश बावस्कर पळत जाऊन त्यांच्या ऑटोकडे गेले ऑटो सुरू करीत असताना पुन्हा विठ्ठल वार करण्यासाठी आला.
तेवढ्यात गणेश बावस्कर यांचा भाऊ संजय बावस्कर हा वाचवण्यासाठी आला. विठ्ठल संजय बावस्कर यांच्यासोबत देखील वाद करून मानेवर चाकूने वार केला..यामुळे संजय बावस्कर यांच्या मानेतून रक्त वाद होते. गणेश बावस्कर यांनी भाऊ संजय बावस्कर यांना तातडीने ऑटोत टाकून पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी दोन्ही भावांना तात्काळ सईबाई मोटे रुग्णालयात दाखल केले. संजय बावस्कर यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अकोला येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विठ्ठल त्र्यंबक बुडकले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...