मलकापूर पांगऱ्यात पैशाच्या वादातून खुपसा–खुपशी! तिघे जखमी, दोघांवर गुन्हा दाखल...

 
 मलकापूर पांग्रा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे पैशाच्या वादातून चाकू हल्ल्याची गंभीर घटना घडली असून तिघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहेलखान मेहराजखान पठाण (वय २८, रा. मलकापूर पांग्रा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नाजीमखा शौकतखाँ पठाण व मोसीनखान शौकतखान पठाण (दोघेही रा. मलकापूर पांग्रा) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. मोटारसायकलच्या पैशाच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. आरोपींनी फिरोजखान रज्जाकखा पठाण, अफरोजखा उर्फ रईसखा रज्जाकखा पठाण आणि फिर्यादी साहेलखान पठाण यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच मारहाण करत दाताने चावा घेतल्याचे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ११५ (२), ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), ३ (५) अन्वये गुन्हा क्रमांक १२७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी २.२४ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हा ए.एस.आय. बाजीराव खरात यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार निवृत्ती पोफळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.