समृद्धी महामार्गावर जीवघेणा प्रवास ! नशिबाने वाचताएत अनेकांचे जीव..
Updated: Jul 16, 2024, 18:08 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वाढत्या अपघातांसाठी समृद्धी महामार्ग काही नवीन उदाहरण नाही. शेकडो लोकांना या महामार्गावर आपले प्राण गमवावे लागले. असे असताना, पुढील संभाव्य अपघातासाठी समृद्धी वरील भगदाड कारणीभूत ठरू शकणार असल्याचे दिसून येते. बुलढाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील एका लेनला भले मोठे भगदाड पडले आहे.
येथून एकच लेन सुरू असल्याने, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. समृद्धीवरील अपघातांच्या घटनांचे शेकडो उदाहरण असताना, तसेच अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या मार्गावर पुन्हा मृत्यूला आवतन देण्याचे एक कारण समोर आले आहे. ते म्हणजे हे मोठे भगदाड. मुंबई कॉरिडॉर चैन नंबर ३३२.६ क्रमांकावर हे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपासून इथल्या दोन लेन बंद आहेत. ही गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.