पिंप्राळा फाट्यावर भरधाव ट्रकने गुरांचा कळप चिरडला; ५ मुक्या जीवांचा जागीच अंत

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव-अकोला राष्ट्रीय महामार्गावर पिंप्राळा फाट्याजवळ आज दुपारी रस्त्याने जात असलेल्या गुरांच्या कळपाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ४ ते ५ गाई व गोऱ्हे जागीच ठार झाले, तर २ ते ३ गुरे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धाकड कंपनीचा ट्रक भरधाव वेगाने जात होता. याचदरम्यान पिंप्राळा फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या गुरांच्या कळपाला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काही गुरे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याने परिसरातील दृश्य अत्यंत विदारक झाले होते.

या अपघातात ४ ते ५ गुरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, २ ते ३ गुरे गंभीर जखमी झाली आहेत. जखमी गुरांवर स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ महामार्गावर रस्ता रोखून धरला. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी चर्चा केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.