भरधाव चारचाकीची स्कुटीला धडक; शिक्षिकेचा जागीच मृत्यू...

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कवठळ ते भेंडवळ मार्गावरील पेसोडा फाट्याजवळ २ मार्च रोजी सकाळी सुमारे सव्वासात वाजता झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. वृषाली प्रकाश गावंडे (वय ३६) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या वृषाली गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. त्या एमएच-२८-एएल-५८१५ क्रमांकाच्या स्कुटीने शाळेकडे जात होत्या. कवठळ ते भेंडवळ मार्गाने जात असताना पेसोडा फाट्याजवळ एका दूध संकलन केंद्राच्या सेंट्रो गाडीने मागून स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू आणि सासरे असा परिवार आहे.