काळीज पिळवटून टाकणारा अपघात! मोटारसायकल आणि कारची समोरासमोर धडक; लग्नाहून परतणाऱ्या पती– पत्नीचा मृत्यू; पळसखेड दौलत गावावर शोककळा; केळवद जवळची घटना 

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा चिखली रोडवरील केळवद फाट्याजवळ काल, २० एप्रिलच्या रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली, यात दुचाकीस्वार पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची भीषणता एवढी की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, धडक बसल्यानंतर पती पत्नी सुमारे २० ते २५ फूट हवेत उडून रस्त्याच्या कड्याला असलेल्या निंबाच्या झाडाला धडकले..

Advt 

गणेश गायकवाड आणि उषा गायकवाड अशी अपघातात ठार झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. ते मूळचे पळसखेड दौलत येथील राहणारे असून चिखलीच्या संभाजीनगरात राहत होते. गणेश गायकवाड हे मलगी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. नातेवाईकांच्या लग्नासाठी पती पत्नी बुलडाणा येथील आराध्या लॉन येथे आले होते. लग्न आटोपून जात असताना केळवद गावाजवळ हा भीषण अपघात झाला..
चिखलीकडून बुलढाण्याकडे जाणाऱ्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला उडवल्याने हा भीषण अपघात झाला, अपघातानंतर कार देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घुसली.. अपघातास जबाबदार असणारा कारचालक कार घटनास्थळावर सोडूनच फरार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,पुढील तपास सुरू आहे.