"खाकीला काळा डाग! मदतीच्या नावाखाली ५ हजारांची लाच गिळताना बीबी पोलीस ठाण्याचा अंमलदार सतीश नागरे एसीबीच्या जाळ्यात; लोणार तालुक्यात खळबळ"

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी संतापजनक घटना लोणार तालुक्यात उघडकीस आली आहे. गुन्ह्यात घेतलेला पोलीस कस्टडी रिमांड (PCR) वाढवू नये आणि तपासात मदत करावी, यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीबी पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार (हेड कॉन्स्टेबल) सतीश रामभाऊ नागरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ जेरबंद केले. मंगळवारी (२८ जुलै) लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील बसथांबा परिसरात झालेल्या या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात घेतलेल्या पीसीआरमध्ये वाढ करू नये आणि तपासात मदत करावी, यासाठी सतीश नागरे याने सुरुवातीला ६ ते ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. कायद्याचा धाक दाखवून नागरिकांकडून पैशांची मागणी केल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने थेट बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने २८ जुलै रोजी लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान सतीश नागरे याने तडजोड करत ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागणी निश्चित होताच एसीबीने सापळा रचला.

योजनेनुसार लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसथांबा परिसरात पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सतीश रामभाऊ नागरे (वय ४०, रा. जऊळका, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा घटकाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष सापळा कारवाई पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या यंत्रणेतील काही भ्रष्ट प्रवृत्तींच्या अशा कृत्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणाऱ्या एसीबीच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून, अशा लाचखोरांवर आणखी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.