बसस्थानकातून २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता! मलकापूरला जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसली, पण घरी पोहोचलीच नाही; कुटुंबीय चिंतेत, पोलिसांकडून शोध सुरू...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूरला जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेली २० वर्षीय तरुणी घरी पोहोचलीच नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मामाच्या गावाहून परतत असताना ही तरुणी बेपत्ता झाली. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत असून या प्रकरणी तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी १३ नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या मामाच्या गावी भाऊबीजेसाठी गेली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मामाच्या कुटुंबीयांनी तिला बुलढाण्याहून मलकापूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसवून दिले. मात्र, ती घरी पोहोचलीच नाही. तिचा मोबाइलही बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाइकांनी विविध ठिकाणी शोधाशोध केली; मात्र तिचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर १६ नोव्हेंबर रोजी तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तरुणी नेमकी कुठे गेली, याचा शोध घेतला जात आहे.