BREAKING मेहकरात २० वर्षीय तरुणाचा खून;काय आहे कारण? मेहकरात कायद्याचा धाक उरला नाही..?

 
मेहकर(अनिल मंजुळकर:
बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या वादातून एका २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. आकाश राजेश नन्नवरे (२०, रा. माळीपेठ, मेहकर) असे मृतक तरुणाचे नाव आहे. काल,२७ मार्चच्या रात्री १० च्या सुमारास मेहकर जानेफळ रोडवरील हॉटेल "पाटलाचा वाडा" समोरील निर्जन भागात ही घटना घडली.
 प्राप्त माहितीनुसार आकाश नन्नवरे याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. पैशांच्या किंवा सावकारी प्रकरणातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. काल रात्री आकाश आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गंभीर जखमी अवस्थेत आकाशला रात्रीच अकोला येथे उपचाराकरिता हलविण्यात आले होते,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तूर्तास या घटनेबद्दल अधिक बोलण्यास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. शिंगटे यांनी नकार दिला, आधी गुन्हा तर दाखल करू द्या असे शिंगटे म्हणाले..
मेहकरात कायद्याचा धाक उरला नाही? 
  मेहकर शहर आणि परिसरात गेल्या महिन्यापासून कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचे चित्र आहे. ठाणेदार शिंगटे यांचा पोलीस यंत्रणेवर, गुन्हेगारांवर पाहिजे तसा वचक नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे सगळ्याच प्रकारचे अवैध धंदे, छोट्या मोठ्या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अल्पवयीन गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे, "काही होत नाही भावा" असे म्हणत अनेक तरुण टोकाचा गुन्हा करायला मागे पुढे पाहत नाहीत..रात्रीची खुनाची घटना ही त्यापैकीच एक...