दोन मित्रांना वाचवताना २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; २२ तासांच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह सापडला
शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी दुपारी योगेश आपल्या मित्रांसह वारी हनुमान येथे सहलीसाठी आला होता. यावेळी त्याचे मित्र ओम प्रशांत बोचरे (वय २०) व आकाश विनोद वानखडे (वय २४) यांनी वाण नदीत पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र दोघेही खोल पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी योगेशनेही नदीत उडी मारली. इतरांच्या मदतीने ओम आणि आकाश यांना बाहेर काढण्यात यश आले; मात्र योगेश खोल पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. हिवरखेड रूपराव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक आदिवासी युवक तसेच खुटपुरी येथील नागरिकांनीही रात्रभर शोधकार्य सुरू ठेवले. मात्र अंधार आणि खोल पाण्यामुळे शनिवारी रात्री मृतदेहाचा शोध लागला नाही.
रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. सकाळी सुमारे १०.२५ वाजता घटनास्थळापासून सुमारे १०० फूट अंतरावर खोल पाण्यात योगेशचा मृतदेह आढळून आला. संबंधित ठिकाण बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पोलीस हवालदार **शाकीर पटेल** यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
शवविच्छेदनानंतर योगेशचा पार्थिव खुटपुरी येथे नेण्यात आले. रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांनी एकच हंबरडा फोडला.