याला अपहरण म्हणायचे का भो! बुलडाण्याच्या सपनाची  खरी स्टोरी वाचल्यावर तुम्ही म्हणाल हे तर लफड! इंस्टाग्राम वरून मेहकरच्या तरुणासोबत ओळख अन्  त्याच्यासोबतच फरार! प्रत्येक पालकांनी वाचाच ही स्टोरी...

 
बुलडाणा(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात काही दिवसांपासून मुले ,मुली पळवणारी टोळी असल्याची चर्चा होती. मात्र ती अफवा असल्याचे आणि ती का पसरते याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने आधीच प्रकाशित केले होते. अपहरणाच्या घटना वाढल्याचे का दिसते याचे उत्तरही बुलडाणा लाइव्ह ने त्या बातमीत दिले होते. अल्पवयीन मुले किंवा मुली स्व- इच्छेने  घर सोडतात तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल केल्या जातो. त्यांना सगळ कळत असल तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून ते मात्र सज्ञान नसतात. दरम्यान बुलडाणा तालुक्यातील एका गावातून १७ वर्षे ७ महिन्याची मुलगी गायब झाली आहे. मुलीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मेहकरच्या शिवा गिरी या तरुणाविरुद्ध अपहरणाचा  गुन्हा दाखल केला. मात्र हे खरच अपहरण आहे का ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बातमी वाचल्यावर मिळेलच..

तर त्याचे असे आहे की बुलडाणा तालुक्यातील एका गावातील सपना( नाव बदलले आहे) सध्या १२ व्या वर्गात शिकत असून तिचे वय १७ वर्ष ६ महिने इतके आहे. वर्षभराआधी इंस्टाग्राम वरून मेहकरच्या शिवा गिरी याच्यासोबत त्याची ओळख झाली. वडीलांची नजर चुकवून त्यांच्या मोबाईलवरून सपना त्याच्याशी बोलू लागली. मात्र याची खबरबात तिच्या वडिलांना नव्हती. मात्र १५ दिवसांपूर्वी आपल्या मुलीचे मेहकरच्या शिवा गिरी याच्याशी लफडे असल्याचे मुलीच्या वडिलांना कळले.
    
कसे झाले माहीत...
 
 तर त्याचे झाले असे की १५ दिवसांपूर्वी सपनाच्या वडिलांच्या फोनवर शिवा गिरी याने फोन केला. मला तुमची मुलगी सपना आवडते, माझे तिच्यासोबत लग्न लावून द्या असे तो म्हणाला. यावर सपनाच्या वडिलांनी तुम्ही कुठे राहता अशी विचारणा केल्यावर त्याने मिलिंद नगर,मेहकर असा पत्ता सांगितला. मात्र तुमची आमची जात वेगळी असल्याने सोयरिक होऊ शकत नाही असे बोलून सपनाच्या वडिलांनी फोन कट केला. मात्र सपनाने वडिलांच्या फोनवरील कॉल हिस्ट्री डिलीट केल्याने सध्या त्यांच्याकडे शिवा गिरी याचा नंबर नाही. 
 
मुलीची समजूत काढली पण...

दरम्यान या प्रकारानंतर सपनाच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी   सपनाची समजूत काढली. तू त्या मुलाशी संबध ठेवू नको असे तिच्या वडिलांनी तिला सांगितले. दरम्यान त्या दिवसापासून मुलगी मात्र विचित्र वागत होती असे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

शिक्षण बंद कर..

दरम्यान मुलीच्या या विचित्र वागण्याने तिचे वडील मात्र प्रचंड तणावात होते. त्यामुळे तू शाळेत जाऊ नको तुझे शिक्षण बंद कर असे तिचे वडील म्हणत होते. दरम्यान २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता तू शाळेत जाऊ नको असे सपनाला तिचे वडिल म्हणाले. त्यावर मी फक्त आजच्याच दिवस शाळेत जाणार आहे,उद्यापासून शाळेत जाणार नाही असे म्हणून ती घरून निघून गेली. दुपारी १२ वाजले तरी सपना घरी परतली नव्हती. त्यामुळे तिच्या वडिलांनी शाळेत चौकशी केली ती आज शाळेत आलीच नव्हती असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी सगळीकडे शोध घेऊन सपना न सापडल्याने सपनाला मेहकरच्या शिवा गिरी यानेच फुस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सपनाचे १८ वर्ष वय पूर्ण झाले नसल्याने पोलिसांनी शिवा गिरी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
 ( तर वाचकहो..जिल्ह्यात ज्या अपहरणाच्या घटना घडतात त्या बहुतांशी अशाच असतात. त्यामुळे कायदा याला अपहरण म्हणत असला तरी तुम्ही काय म्हणायचे ते ठरवा..)