तिच्या नादी लागू नका! ती सुंदरी तुम्हाला "खुली" ऑफर देईल पण; बुलडाणा तालुक्यातल्या माजी सरपंचासोबत जो धक्कादायक प्रकार घडला तो तुमच्यासोबतही घडू शकतो..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ती तुम्हाला फोन करेल..गोड गोड आवाजात बोलून तुमच्याशी जवळीक निर्माण करेल..ती जणू काही तुमच्या प्रेमात पडली असे तुम्हालाही वाटेल..तुमच्या शरीरसुखासाठी ती तिचा जीव ओवाळून टाकण्याची तयारी असल्याचे सांगेल. त्यानंतर "त्या" सुखासाठी ती तुम्हाला एखाद्या निर्जन स्थळी बोलवेल..तेवढ्यात तिचे इतर साथीदार तुमच्यावर झडप घालतील,  तुमची व्हिडिओ शूटिंग काढल्याचे सांगत ती व्हायरल करण्याची धमकी देतील..अन तुमच्याकडून उकळतील लाखो रुपये..! शत्रूच्या सेनापतीला जाळ्यात अडकविण्यासाठी जुन्या काळात  सुंदर स्त्री चा वापर केल्या जात होता.. तोच हनी ट्रॅपचा खेळ आता पैसे कमावण्याचे साधन बनलाय. अगदी आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील काही टोळ्या सुद्धा तो खेळ खेळत आहेत. बुलडाणा तालुक्यातील एक माजी सरपंच असाच एका जाळ्यात अडकला..मात्र लवकर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने त्याचे होणारे मोठे नुकसान टळले. मात्र तरीही ५ हजार रुपयाला चुना लागलाच! बुलडाणा शहर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत या टोळीला अटक केली आहे.

त्याचे झाले असे की बुलडाणा तालुक्यातील एका माजी सरपंचाला त्या २२ वर्षीय महिलेने जाळ्यात ओढले. शरीरसुखाची खुली ऑफर देऊन बुलडाणा शहरातील डीएड कॉलेज परिसरातील निर्मनुष्य भागात बोलावले. तिच्या नादी लागून सरपंच त्या परिसरात पोहचला. दोघे एकमेकांच्या जवळ जात असतानाच आधीपासून लपलेले तिचे पाच सहकारी तिथे आले. आम्ही तुमची शूटिंग केली आहे ती व्हायरल करायची नसेल तर १ लाख रुपये द्या अशी धमकी त्यांनी सरपंचाला दिली.

तेवढे पैसे नसल्याचे माजी सरपंचाने सांगितल्याने त्या टोळीने माजी सरपंचाला बेदम मारहाण करून ५ हजार रुपये हिसकावून पळ काढला.  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माजी सरपंचाने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी  अवघ्या काही तासांत त्या महिलेसह ५ जणांना अटक केली. कृष्णा भास्कर पवार(२४), अजय सुनील विरशिद (२२), रुपेश शंकर सोनवणे(२२), संतोष सखाराम जाधव(३५) अशी आरोपींची नावे आहेत . यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह २३ वर्षीय महिलेचा देखील समावेश आहे.