Birthday Special : एलसीबीप्रमुख बळीराम गीते गुन्हेगारांचे कर्दनकाळ तरीही सहृदयशील अधिकारी... सामान्य कुटुंबातील या कर्तबगार अधिकाऱ्याची अशी आहे कहानी!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याला मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सध्या बुलडाणेकर नशिबवानच म्‍हणावे लागेल. अपवाद वगळता बहुतांश सर्वच अधिकारी कर्तव्यकठोर आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले दिसून येतात. त्‍यातल्या त्‍यात पोलीस विभागातील तर सर्वच अधिकारी सध्या जनतेला खाकीशी एकरूप करण्यात गुंतलेले दिसून येतात. कोणताही दबाव सहन न करता सामान्यांच्या रक्षणासाठी, त्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपणाऱ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाने साहाजिकच सामान्यांच्या मनात वेगळी उंची गाठली आहे. पोलीस अधिकारी म्‍हटलं की, करारी चेहरा, बोलण्यात जरबता आलीच. त्‍यातल्या त्‍यात स्‍थानिक गुन्हे शाखा सांभाळणारा अधिकारी म्‍हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळच... पण असे असूनही स्‍थानिक गुन्हे शाखा प्रमुख बळीराम गीते हे खाकीतली माणुसकीही तितकीच जपून आहेत. याचे प्रत्‍यंतर वारंवार जिल्ह्याला दिसून आले आहे. संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी परंपरेशी जुळलेले श्री. गिते दीड वर्षापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळत आहेत. आज, १० फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने...

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक या छोट्याशा खेड्यात सामान्य शेतकरी अन् वारकरी कुटुंबात बळीराम गिते यांचा जन्म झाला. ५ भावंडांत ते सर्वात लहान. घरात वारकरी परंपरा असल्याने रोज सकाळी त्यांची आई त्यांना नदीवर अंघोळीसाठी आणि नंतर गावातल्या काकड आरतीसाठी पाठवायची. गावातील ८० लोक माळकरी. त्यामुळे गावातील मंदिरावर भजन, कीर्तन, भारुडे म्हणण्यासाठी ते जायचे. त्यामुळे संतसाहित्याची गोडी बालवयातच लागली. पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. ८ ते १० वीपर्यंत शिक्षणासाठी बदनापूर येथे रोज ४ कि.मी. पायी जाणे आणि येणे असा ८ कि.मी.चा प्रवास केला. दरम्यान, आई- वडील शेतकरी असल्याने शेतात नांगरणी, वखरणी, पेरणी अशीच सर्वच कामे ते करायचे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते जालन्यात आले. जालन्याच्या जेईएस महाविद्यालयात ११ वी, १२ वी, बी.कॉम., एम. कॉम., बी. एड. आणि डी.बी. एम. असे शिक्षण घेतले. जालन्यात भाड्याची खोली, हाताने केलेला स्वयंपाक आणि अभ्यास हे दिवस अविस्मरणीय असल्याचे ते सांगतात. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांचा संतसाहित्याचा अभ्यास सुरूच होता. ज्ञानेश्वरी, भगवद्‌गीता, तुकोबारायांची गाथा, एकनाथ महाराजांची भारुडे आणि कबिरांच्या दोह्यांनी जीवन घडविल्याचे ते सांगतात.

शिक्षण आटोपल्यावर प्राध्यापक म्हणून नोकरी...
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री. गीते यांनी जालन्यातील जेईएस आणि दानकोर महिला महाविद्यालयात दोन वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कॉलेज जीवनात असताना एनसीसी आणि एनएसएसमध्ये असल्याने त्यांना सैन्यदलाविषयी आकर्षण होते. देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलीस दलाचे, अधिकाऱ्यांचे त्यांना मोठे आकर्षण. त्यामुळे आपणही पोलीस अधिकारी झाले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. प्राध्यापक म्हणून शिकवत असताना विद्यार्थी म्हणून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. दरम्यान १९९४ ला ते पीएसआयची (पोलीस उपनिरिक्षक) परीक्षा पास झाले आणि १९९५ ला पहिली पोस्टिंग धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात झाली. त्यानंतर जळगाव, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत त्‍यांनी काम केले. एपीआय (सहायक पोलीस निरिक्षक) म्हणून प्रमोशन झाल्यानंतर बीड जिल्ह्यात वाहतूक शाखा, बीड ग्रामीण, अंबेजोगाई, औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे काम केले. २०१३ मध्ये प्रमोशन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चिखलदरा, त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील तामगाव, सिंदखेड राजा, वाशिम येथे जबाबदारी सांभाळली. बुलडाणा येथे गृहविभागात  पोलीस उपअधीक्षक म्हणून आणि त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून ते संपूर्ण जिल्ह्याचे गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

कारवायांचा धडाका...
गेल्या दीड वर्षापासून एलसीबी प्रमुख म्हणून बळीराम गीते यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांचे अतिशय विश्वासू अधिकारी म्हणून श्री. गितेंची ओळख आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील गुन्ह्यांचा शोध लावण्याचे प्रमाण वाढले आहे. शस्त्रजप्तीच्या कारवाया, खून प्रकरणातील आरोपींचा शोध, गुटखा माफियांवरील स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवायांनी गुन्हेगारांना धडकी भरवली आहे. जिल्ह्यात गेल्या काही काळात घडलेल्या एटीएम फोडीच्या, दरोड्यांच्या आणि धान्य गोदाम फोडीच्या घटनांमधील आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम बळीराम गीते यांच्या नेतृत्वात एलसीबीने केले आहे. जिल्हाभरात श्री. गीते यांनी खबऱ्यांचे जाळे तयार केले आहे. याशिवाय लोकांमध्ये मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाने ते जिल्ह्यातील लोकप्रिय अधिकारी ठरले आहेत.

या प्रकरणाचा शोध लावणे होते आव्हानात्मक...
गोष्ट आहे २००४ ची.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस ठाण्यात श्री. गीते पोलीस उपनिरीक्षक होते.  ८ वर्षीय पुतण्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात मुलाच्या काकाने दिली होती. त्यानंतर ५० हजार रुपये द्या मग मुलाला सोडतो, असे लिहिलेल्या चिठ्ठ्या मिळत असल्याचे मुलाचा काका पोलिसांना सांगत होता. त्या सर्व चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. दरम्यान त्या मुलाचा खून झाल्याचे समोर आले होते. मृतदेह आढळल्याची तक्रारही मुलाच्या काकाने दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी म्हणून खुन्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान श्री. गीते यांच्यासमोर होते. तपासाचा भाग म्हणून श्री. गीते यांनी मुलाच्या काकाच्या घराची तपासणी केली. घरातून एक वही त्यांना मिळाली. आधी प्राप्त झालेल्या चिठ्ठ्या आणि त्या वहीचा कागद सारखाच होता. शिवाय त्या वहीतील काही पानेही फाडण्यात आल्याचे समोर आले. फाडण्यात आलेल्या पानांच्या खाली वरच्या पानावर लिहिलेले शब्द उमटले होते. त्यामुळे श्री. गीते यांचा संशय तक्रारदार असलेल्या मुलाच्या काकावरच गेला. कसून चौकशी केल्यानंतर फिर्यादी हाच आरोपी निघाल्याचे निष्पन्‍न झाले. भावाला एकच मुलगा होता. त्याला संपवले तर संपत्तीत वाटेकरी कुणी राहणार नाही म्हणून काकानेच पुतण्याचा खून केल्याचे प्रकरण तेव्हा गाजले होते. या खुन्याचा  शोध घेणे तत्कालिन परिस्थितीत खूप आव्हानात्मक होते, असे श्री. गीते यांनी सांगितले.

गुन्हेगार अपडेट होतात, पोलिसांनीही अपडेट व्हावे...
हल्ली गुन्हेगारसुद्धा नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. नवनवीन तंत्र वापरून गुन्हेगार गुन्हे घडवत आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी आता पोलिसांनी सुद्धा काळानुरूप अपडेट होण्याची गरज आहे, असे श्री. गीते सांगतात. जिल्ह्यात घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल बोलताना श्री. गीते म्हणाले, की सध्या कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. एकत्र परिवार ही संकल्पना लोप पावत आहे. गुणदोषांसहित नात्यांना स्वीकारल्यास या घटना कमी होतील. याशिवाय परिवारात चांगली पुस्तके वाचण्याचा, चांगल्या विचारांचा संस्कार असावा, असे ते म्‍हणाले. आमचा ३५ जणांचा एकत्र परिवार आहे, असेही त्यांनी सांगितले. कठीण परिश्रम घेतल्यास यश दूर नाही. सध्या स्पर्धा वाढली असली तरी परिश्रमाचे फळ मिळतेच. तरुणांनी स्वतःचे ध्येय ठरवले पाहिजे. ध्येयप्राप्तीसाठी झटले पाहिजे. यश तुमच्यापासून कुणीही हिसकावून घेणार नाही, असा संदेश ते तरुणपिढीला देतात.