घराचा जिना कोसळून ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; उमाळी गावात शोककळा...
Mar 28, 2026, 09:06 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)— मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे घराचा जिना अचानक कोसळल्याने ६ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमाळी येथील रहिवासी उमाबाई पांडुरंग धोरण यांची नात कु. प्रगती गणेश कडोळे (वय ६) ही सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी होती. याच दरम्यान घराचा जिना अचानक कोसळला. या दुर्घटनेत प्रगतीचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेत तिची आजी उमाबाई धोरण व आई या देखील जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.या दुर्दैवी घटनेमुळे उमाळी गावावर शोककळा पसरली असून, निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूने गावकऱ्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे.