ठेका मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेत जोडली ५ बनावट प्रमाणपत्रे; मुंबईच्या ठेकेदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; खडकपूर्णा प्रकल्पातील अनियमितता उघड !
Oct 10, 2025, 09:08 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. मागील दीड महिन्यापूर्वी एका ठेकेदाराविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा असाच एक नवीन प्रकार वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीत उघड झाला आहे.या प्रकरणात मुंबई येथील एका ठेकेदाराविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बालाजी रामकृष्ण तिप्पलवाड (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम) यांनी बुधवारी रात्री बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, खडकपूर्णा प्रकल्पाच्या दगडवाडी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालवा क्र. १३ ते १७ या भागातील मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान अधीक्षक अभियंता, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयात ठेकेदार मे. एम. वाय. कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मोहम्मद यासीन सिद्दीकी राठोड (मयत), रा. माहीम, मुंबई यांनी गैरकृत्य केले.सदर ठेकेदाराने निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी लोकसेवकांनी जारी न केलेली पाच बनावट अनुभव प्रमाणपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवले, आणि त्या आधारावर पूर्वअर्हता निकष पूर्ण करून निविदेत पात्र ठरले. अशा प्रकारे त्यांनी शासनाची फसवणूक करत स्वतःचा आर्थिक गैरफायदा करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून ठेकेदार मोहम्मद यासीन मोहम्मद सिद्दीकी राठोड (मयत), रा. माहीम, मुंबई यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि सरकारी प्रक्रियेत हस्तक्षेप या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चपाईतकर करत आहेत.