मलकापूरमध्ये पावणेचार किलो गांजा जप्त; ५८ वर्षीय व्यक्ती ताब्यात, १.९१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती!
गुप्त माहिती मिळताच पोलिसांचा छापा
मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत मुकुंद नगर परिसरात एका व्यक्तीकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची दखल घेत डीबी पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.यावेळी वासुदेव प्रल्हाद वानखेडे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान हिरवट-काळसर रंगाचा, उग्र वास असलेला गांजा आढळून आला.
३ किलो ८३० ग्रॅम गांजा; किंमत १ लाख ९१ हजार ५०० रुपये
पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजन ३ किलो ८३० ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याची किंमत प्रति किलो ५० हजार रुपये प्रमाणे १ लाख ९१ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचांसमक्ष तसेच राजपत्रित अधिकारी आणि नायब तहसीलदार राठोड, मलकापूर यांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस नाईक शुभम बरदाडे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध NDPS कायद्यातील कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि. देविदास पाटील, पोउपनि. शुभम बरदाडे, पोहेकॉ. रामचंद्र भोपळे, पोकॉ. आसिफ शेख, संतोष कुमावत, सुनील थोरात, गणेश बरडे, योगेश तायडे, दीपक सोनोने, प्रवीण गवई, नवल राठोड तसेच मपोकॉ. मीनल शिंदे यांनी सहभाग घेतला.