शेगाव शहरातील लॉजवर १९ वर्षीय युवतीवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील मंदिर परिसरातील एका लॉजवर २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित युवतीने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता आरोपी आकाश सोनाजी भामद्रे (रा. सोनाळा) याने दर्शन झाल्यानंतर “तुझ्याशी बोलायचे आहे” असे सांगत तिला मंदिर परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिची इच्छा नसताना आरोपीने वाईट उद्देशाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर सदर घटनेची कुणालाही माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेच्या तोंडी फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ६४, ७४, ३५१ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कलम ३ (१)(w)(i), ३ (१)(w)(ii), ३ (२)(v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.