शेगाव शहरातील जगदंबानगरातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता!  मोबाइल स्विच ऑफ; शाळेतही गैरहजर, मैत्रिणी-नातेवाईकांकडे शोध घेऊनही ठावठिकाणा नाही...

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव शहरातील जगदंबानगर परिसरातून १८ वर्षे २ महिन्यांची तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीचा मोबाइल स्विच ऑफ असल्याचे आढळून आल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या राहत्या खोलीसह शाळा, मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, कुठेही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर वडिलांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संतोष मारोती लहुटे (वय ४९, रा. माळेगाव बाजार, ता. तेल्हारा) यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन केला अन् मोबाइल स्विच ऑफ

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लहुटे यांनी मुलीशी शाळेतील दैनंदिन अभ्यासाबाबत विचारपूस करण्यासाठी फोन केला. मात्र, तिचा मोबाइल स्विच ऑफ असल्याचे समोर आले. त्यामुळे काळजीत पडलेल्या वडिलांनी तातडीने शेगाव गाठून मुलगी राहत असलेल्या जगदंबानगरातील खोलीवर जाऊन पाहणी केली. मात्र, ती खोलीतही आढळून आली नाही.

यानंतर तिच्या शाळेत चौकशी केली असता ती शाळेत गेली नसल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणी, नातेवाईक तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला. मात्र, सर्वत्र चौकशी करूनही तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

१२ सप्टेंबरपासून बेपत्ता

तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तरुणी बेपत्ता झाली आहे. तिचा बराच शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नसल्याने अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

तरुणीचे वर्णन

बेपत्ता तरुणीचा रंग गोरा असून बांधा सडपातळ आहे. तिची उंची अंदाजे ५ फूट ४ इंच असून, गालावर जळाल्याचा डाग आहे. केस लांब व काळेभोर आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ सुनील सुसर करीत आहेत. बेपत्ता तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने शेगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.