देऊळगाव राजात १६ वर्षे ८ महिन्यांची मुलगी बेपत्ता; पंजाबहून नातेवाईकांकडे आली, घराबाहेर पडली अन् परतलीच नाही!

 
 देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पंजाब राज्यातून काही दिवसांपूर्वी नातेवाईकांकडे देऊळगाव राजा येथे राहण्यासाठी आलेली १६ वर्षे ८ महिन्यांची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी घराबाहेर पडलेली ही मुलगी सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी पंजाबमधून देऊळगाव राजा येथील आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. ९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता ती घरातून बाहेर पडली. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही.

मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. फिर्यादी लखन वर्मा यांनी देऊळगाव राजा शहरातील नातेवाईकांसह इतर संभाव्य ठिकाणी फोन करून तिच्याबाबत माहिती घेतली. मात्र, विविध ठिकाणी शोध घेऊनही आजपर्यंत तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.अखेर अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून लखन वर्मा यांच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.