माेताळ्यात १४ किलाे ८०० ग्रॅम गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई! बाेराखेडी पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ? एका संशयीतास घेतले ताब्यात!
Jul 20, 2025, 08:57 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरूच असून पथकाने १९ जुलै राेजी रात्री माेताळा येथे धाड टाकून १४ किलाे ८०० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका संशयीतास पाेलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे बाेराखेडी पाेलीस स्टेशनच्या काही मिटर अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. त्यामुळे, बाेराखेडी पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पाेलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असली तरी या कारवाईची माहिती बाेराखेडी पाेलिसांना नव्हती हे विशेष.
माेताळा येथे गांजाची विक्री हाेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांच्या नेतृत्वाखाली चांद शेख, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, विजय वारुळे, समाधान टेकाळे, मंगेश सनगाळे आणि गजानन गोरले यांनी माेताळ्यात धाड टाकली. यावेळी काशिनाथ मोहन मोहिते (रा. राजे संभाजीनगर, मोताळा) हा, त्याच्या घरी अवैध गांजाची विक्री करीत असल्याचे आढळले. पथकाने यावेळी १४ किलो ८०० ग्रॅम गांजा हस्तगत केला. याची अंदाजित किंमत सुमारे २ लाख ९७ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.