१३ वर्षांची समृद्धी विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी; निमगाव वायाळ गावावर शोककळा...

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – "आई गं!" असे शब्दही उच्चारता न येता अवघ्या १३ वर्षांच्या चिमुकलीचे आयुष्य एकाएकी संपले... तालुक्यातील निमगाव वायाळ येथे ३ जुलै रोजी सकाळी झालेल्या हृदयद्रावक घटनेत समृद्धी गैबीनाथ वायाळ या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी समृद्धी शाळेची तयारी करत होती. घरासमोरील नळावर पाणी भरताना ती अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आली. नळालाच करंट उतरत असल्याने तिला तीव्र शॉक बसला आणि ती जागीच कोसळली. आजोबा व शेजाऱ्यांनी तत्काळ तिला किनगाव राजा येथील खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
समृद्धी ही हिवरखेड पूर्णा येथील विजय मखमले विद्यालयात सातवीत शिकत होती. अभ्यासात हुशार, आज्ञाधारक, सर्वांची लाडकी अशी तिची ओळख होती. शाळेतील उपक्रम, खेळांमध्ये ती नेहमी पुढे असायची. तिच्या अचानक जाण्याने वर्गमित्र, शिक्षक, शाळा प्रशासन तसेच संपूर्ण गाव सुन्न झाला आहे. शाळेतील वर्गखोल्या आज तिच्या आठवणींनी भरून वाहत आहेत.
घटनेनंतर वायाळ कुटुंबीयांवर शोककळा कोसळली असून गावकरी, शिक्षक, पालकवर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या घरी पोहोचून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. इतक्या कोवळ्या वयात निघून गेलेल्या समृद्धीचे दुःख शब्दातीत असून, या घटनेने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.