मार्च एन्डला 630 पॉझिटिव्ह! खामगावमध्ये कोरोना मोकाट!! 4 तालुक्यांची अर्धशतके

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुटीच्या माहौलमुळे मागील 3 दिवसांत स्वॅब संकलन व तपासणीचा वेग मंदावल्याने कोरोना रुग्णांची संख्याही रोडावली होती. त्या तुलनेत आज, 31 मार्चला रुळावर आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 630 वर पोहोचली! इतर ठिकाणी काय चालले याची तमा न बाळगता एखाद्या खंबीर खेळाडूप्रमाणे खेळणाऱ्या खामगाव तालुक्याने आजही 121 ची …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुटीच्या माहौलमुळे मागील 3 दिवसांत स्वॅब संकलन व तपासणीचा वेग मंदावल्याने कोरोना रुग्णांची संख्याही रोडावली होती. त्या तुलनेत आज, 31 मार्चला रुळावर आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 630 वर पोहोचली!

इतर ठिकाणी काय चालले याची तमा न बाळगता एखाद्या खंबीर खेळाडूप्रमाणे खेळणाऱ्या खामगाव तालुक्याने आजही 121 ची नाबाद खेळी करत सव्वाशेचा पल्ला गाठालाच! अचानक चमकणाऱ्या व शतकाकडे वाटचाल करणारा जळगाव जामोद तालुका रनआउट झाला खरा पण त्यापूर्वी तालुक्याने 92 चा आकडा गाठला. अघोषित कॅप्टन असलेल्या बुलडाणा  तालुक्याने 89, मलकापूरने 74,  देऊळगाव राजाने 53 धावांची खेळी केली. तीनेक दिवसांपासून फॉर्मात असलेल्या सिंदखेडराजा 38, चिखलीमध्ये 36 रुग्ण आढळून आलेत. भोपळाही न फोडणाऱ्या संग्रामपूर तालुक्याने 36 चा आकडा गाठत सोशल मीडियावरील चेष्टेला उत्तर दिले. अगोदरच तालुका झिरो आकड्यामुळे गाजत असताना आता आरोग्य कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशी खरीखुरी सुटी मिळावी, लसीकरण बंद ठेवावे, आदी मागण्या काल वारिष्ठाकडे केल्या. यामुळे तेथील गुंतागुंत आणखी वाढली आहे.

घसरण…

दरम्यान 5 तालुक्यांतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. मोताळा 29, मेहकर15, शेगाव 11, नांदुरा 28, लोणार 8 असे या तालुक्यांचे आकडे आहेत. मात्र हा दिलासा किती तासांचा? या बौन्सररुपी सवालाचा जवाब कोण देणार? अर्थात उद्याचा अहवाल याचे उत्तर घेऊन येणार आहे. याचे कारण कोरोना तर बिनतोड ऑल रॉउंडर खिलाडू आहे. त्याला बाद करता येत नाही. त्याच्या गोलंदाजीवर 4- 6 तर सोडा एक रन सुद्धा घेता येत नाही. मैदानात कुठेही झेल घेण्याची कमाल त्याच्याकडे आहे, यावर कळस म्हणजे सर्व अंपायर त्याच्या खिश्यात आहेत.