पुन्हा साडेपाचशेच्या वर! कोरोना थांबता थांबेना!! बुलडाण्याचे शतक, शेगाव, मलकापुरात स्फोट
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेला 500 पेक्षाही जास्त कोरोना रुग्णांचा सिलसिला आज, 12 मार्चलाही कायम राहिला. आज जिल्ह्यात 567 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने यंत्रणांची डोकेदुखी कायम राहिली. बुलडाणा आघाडीवर आहे हे सांगणे आता औपचारिकता ठरली असून, आजही हा तालुका टॉपर आहेच! मात्र मलकापूर व शेगाव तालुक्यातील वाढते रुग्ण आरोग्य यंत्रणांचे आव्हान खडतर करणारे ठरणार आहे.
जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर(11 मार्चला) कोरोनाचा रेकॉर्डब्रेक महाआकडा आला होता. आज उपवास सोडण्याचा तयारीत असलेल्या लाखो भाविकांसाठी आजचा कमी (!) वाटणारा आकडाच दिलासा ठरला. आज हा आकडा 567 इतका आहे. मागील 8 मार्चपासून पॉझिटिव्हचे आकडे 500 च्या आकारात येऊ लागले. महिला दिन 517, 9 मार्चला 579, आणि 11 मार्चला ला थेट 755 पॉझिटिव्ह अशी कोविडची कामगिरी राहिली. 10 मार्चला तो 385 आला. हेच उपकार असे म्हणण्याची पाळी.
12 मार्चलाही या अघोषित स्पर्धेत नाबाद सेंच्युरी (120) झळकविणारा बुलडाणा तालुका खिलाडी नंबर वन ठरला. मलकापूरने इतरांना मागे टाकीत 92 पॉझिटिव्हसह दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. शेगाव (80) तिसरा असून खामगाव 69, चिखली 49, सिंदखेडराजा 33, नांदुरा व देऊळगाव राजा प्रत्येकी 31,जळगाव जामोद 17, लोणार 14 असा क्रम आहे, या प्रकोपात मेहकरमध्ये केवळ 1 कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे दिलासा मानावा काय हा चर्चेचा विषय ठरू शकतो.
- नमुने संकलन : 1519
- अहवाल प्राप्त : 1760
- पॉझिटिव्ह : 567
- पॉझिटिव्हीटी : 32.21 टक्के
- निगेटीव्ह : 1177,
- मृत्यू दर : 0.89 टक्के
- रिकव्हरी दर 84.71 टक्के