जिल्हा पुन्हा चार आकडी! बुलडाणा साडेतीनशेच्या पल्याड!! मेहकरने ओलांडली धोक्याची पातळी; 10 तालुक्यात थैमान
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः गेले 2 दिवस 3 आकड्यांत राहणाऱ्या कोरोनाने आज, 23 एप्रिलला पुन्हा उसळी घेत चार आकडी संख्या गाठली! गत 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 1035 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बुलडाणा व मेहकर तालुक्याने अनुक्रमे साडेतीनशे व दोनशेचा पल्याड जाऊन धोक्याची पातळी ओलांडली! याशिवाय 10 तालुक्यांतील कोरोना उद्रेक कायम असल्याने आरोग्य यंत्रणा हादरल्या आहे.
बुलडाणा व मेहकर तालुक्यात कोविडचा स्फोट झाल्यागत परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपासून दीडशे ते दोनशेच्या दरम्यान असणाऱ्या तालुक्यात 24 तासात 353 पॉझिटिव्ह आढळले. मेहकर तालुक्यात नव्याने मुसंडी मारणाऱ्या कोविडने 212 चा पल्ला गाठत आरोग्य यंत्रणांच्या तोंडाचे पाणी पळविले ! मोताळा तालुक्यात 24 रुग्ण असल्याने केवळ बुलडाणा मतदारसंघाचा आकडा पावणे चारशेच्या घरात पोहोचला. लोणारात 19 रुग्ण असून, मेहकर मतदारसंघातील आकडा 231 वर गेलाय, अशीच गंभीर स्थिती मातृतीर्थ मतदारसंघाची आहे. देऊळगाव राजात 66 व सिंदखेड राजात 52 पॉझिटिव्ह निघाले. मलकापूर 65, नांदुरा 67 हे आकडे लक्षात घेतले तर मलकापूर मतदारसंघाची स्थिती लक्षात येते. खामगाव 98 अजूनही हॉटस्पॉट असल्याचे चित्र आहे. या तुलनेत 4 तालुक्यांतील कोरोना लागणाची तीव्रता सध्या तरी कायम असणे थोडाफार दिलासा आहे. शेगाव 6, जळगाव जामोद 7, संग्रामपूर 4, लोणार 19 मधील कोविडकुमार सध्यातरी आटोक्यात आहे, आजचे हे चित्र आहे, पण उद्याचा भरवसा काय? हा सवाल आज अनुत्तरित आहे, त्याचे उत्तर उद्याच्या अहवालात दडलंय!
5 बळी…
दरम्यान, गत 24 तासांत पॉझिटिव्हचा आकडा वाढला असतानाच बळींची संख्या देखील 5 वर गेली आहे. बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील 3, तर टीबी रुग्णालय व लद्धड हॉस्पिटलमधील प्रत्येकी एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.