हद कर दी… पालकमंत्र्यांच्या चिरंजिवांनी शुभेच्छा देण्यासाठी झाकला दिशादर्शक फलक!; शिवजयंतीच्या शुभेच्छांपेक्षा वैयक्तीक प्रसिद्धीचा हव्यास!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. पालकमंत्र्यांच्या चिरंजिवांनी त्यावर कडी केली आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी चक्क दिशादर्शक फलकच झाकून टाकला. मलकापूर- सोलापूर रस्त्यावरील दिशादर्शक फलकाचा वापर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. किमान शिवजयंतीच्या तरी शुभेच्छा अशा प्रकारे देणे टाळायचे होते, अशी भावना व्यक्त झाली.
बुलडाणा शहरात होर्डिंग्ज लावण्यासाठी इतर ठिकाणी जागा असताना प्रवाशांना दिशा दाखवणाऱ्या फलकावरच बॅनर लावून पुष्पक शिंगणे यांना काय साध्य करायचे असेल? काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील बुलडाण्यात आले असता त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी याच फलकाचा उपयोग केला होता. राज्यातल्या सत्तेत राष्ट्रवादी चा मोठा सहभाग असल्यामुळेच हे सर्व शक्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बॅनर लावण्याचा अट्टाहास हा खरेच शुभेच्छा देण्यासाठी होता की पुष्पक शिंगणे यांना राजकारणात लॉन्च करण्यासाठी होत असलेल्या प्रसिद्धीसाठी होता ? याचे उत्तर आगामी काळात कळेलच.