शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ! मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश..! २०२३ पासून शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली एवढी मदत....बातमीत वाचा आकडा!
May 23, 2025, 09:12 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची तातडीने दखल घेत, पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे स्पष्ट निर्देश दिले.
“नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन पूर्णपणे संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यातील पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्त पथके तयार करून तातडीने पंचनामे पूर्ण करावेत,” असे मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने २०२३-२४ मध्ये ५४.८ लाख पात्र शेतकऱ्यांना ४,८३३ कोटी रुपयांची मदत दिली असून, २०२४-२५ मध्ये ६९ लाख शेतकऱ्यांना ६,९८९ कोटी आणि १ एप्रिल ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
राज्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारा, दुष्काळ यांसारख्या आपत्तींमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात शासन नेहमीच प्राधान्य देते, हे यावेळी पुन्हा स्पष्ट झाल्याचेही ना. मकरंद पाटील म्हणाले..