नांदुरा, शेगाव तालुक्‍यात दोन जण पुरातून वाहून गेले; खडकपूर्णाचे ११ दरवाजे उघडले!, ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोळ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र जिल्ह्यातील ७ महसूल मंडळांत प्रामुख्याने खामगाव तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले. यामुळे झालेल्या प्रचंड हानीचे सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यात येत आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने नांदुरा व शेगाव तालुक्यातील दोघे वाहून गेले आहेत. त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. पाणलोट क्षेत्रात झालेल्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोळ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र जिल्ह्यातील ७ महसूल मंडळांत प्रामुख्याने खामगाव तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले. यामुळे झालेल्या प्रचंड हानीचे सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यात येत आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने नांदुरा व शेगाव तालुक्‍यातील दोघे वाहून गेले आहेत. त्‍यांचा शोध अद्याप लागलेला नाही. पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या खडकपूर्णा धरणाचे ११ दरवाजे उघडावे लागले आहेत. यापूर्वी १ सप्‍टेंबरला सायंकाळी तीन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ४दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र धरणात जलसाठा झपाट्याने वाढू लागल्याने आज, ६ सप्‍टेंबरला सकाळी ११ दरवाजे ०.२० सें.मी.ने उघडण्यात आले. त्‍यातून ८०२७.६४ क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. खडकपूर्णा नदीपात्रात सध्या ८५ टक्के जिवंत जलसाठा आहे. जिल्ह्यातील वान, पूर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.

आज ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसाठला संपलेल्या गत्‌ २४ तासांत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यातही खामगाव तालुक्यात व जिल्ह्यातील ७ महसूल मंडळात वरुणराजाने अक्षरशः थैमान घातले आहे. या मंडळांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा ७० मि.मी., खामगाव मंडळात ९५ मि.मी., हिवरखेड ८६.८ मि.मी., काळेगाव महसूल मंडळात ८८.३ मि.मी. पावसाने हजेरी लावत विध्वंस केलाय! याच धर्तीवर मेहकर तालुक्यातील वरवंड ८२.५ मि.मी. आणि लोणी मंडळाला ६५.५ मि.मी. पावसाने झोडपून काढले. याचदरम्यान शेगाव तालुक्यातील जवळा मंडळात ६७ मि.मी. पावसाने हजेरी लावली.

तालुकानिहाय जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस ः (कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची). बुलडाणा : 32.7 मि.मी. (602.5), चिखली : 30.8 (593.5), देऊळगाव राजा : 12.2 (556), सिंदखेड राजा : 16.1 (745.3), लोणार : 23.7 (738.3), मेहकर : 46.2 (911.5.), खामगाव : 55.3 (565.3), शेगाव : 35.8 (376.5), मलकापूर : 19 (432.2), नांदुरा : 20.2 (445.3), मोताळा : 29.7 (461.7), संग्रामपूर : 7.5 (497.4), जळगाव जामोद : 8.3 (351.1)

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7276.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 559.7 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 351.1 मि.मी पावसाची नोंद जळगाव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 49.66 आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा असा ः (आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी)– नळगंगा : 37.36 दलघमी (53.89), पेनटाकळी : 24.71 दलघमी (41.19), खडकपूर्णा : 78.85 दलघमी (84.45), पलढग : 3.39 दलघमी (45), ज्ञानगंगा : 25.96 दलघमी (76.53), मन : 35.37 दलघमी (96.32), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 8.01 दलघमी (53.26), तोरणा : 4.02 दलघमी (50.95) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

प्रकल्पांमधून विसर्ग सुरू
जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.30 मीटर असून जीवंत पाणी साठा 96.32 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4 वाजता 3 दरवाजे 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यःस्थितीत नदीपात्रात एकूण 36.00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 05 से.मी. ने 3.09 क्युसेक विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संध्याकाळपर्यंत अहवाल
दरम्यान, या ७ मंडळांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह भाजीपाला, फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसल्याचे वृत्त आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे युद्धपातळीवर पाहणी करण्यात येत असून, आज मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती आरडीसी दिनेश गीते यांनी दिली.

मोताळा तालुक्यातही मुसळधार
दरम्यान गेल्‍या २४ तासांत मोताळा तालुक्यातही कोसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. तालुक्यातील लपाली, चिंचखेडनाथ, जनुना, शेलापूर खुर्द, सिंदखेड, उबालखेड परिसरात अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे.

दोघे गेले वाहून…
रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदीनाल्यांना पूर आला आहे. बुलडाणा, मोताळा, चिखली, खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरात दोन जण वाहून गेले आहेत. नांदुरा तालुक्यातील पातोंडा येथील नितीन गव्हांडे (१४) हा पूर्णा नदीत वाहून गेला आहे. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. बुलडाणा येथून आपत्ती निवारण पथक शोधासाठी रवाना झाले आहे. शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील आदित्य संतोष गवई (१८) हा तरुण नाल्यात वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्यापपर्यंत प्राप्त झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख तथा नायब तहसीलदार संजय बंगाळे यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती निवारण कक्ष व जिल्हा यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

उतावळी प्रकल्पावर गर्दीच गर्दी…
मेहकर (अनिल मंजुळकर) ः
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पावर रोज हजारो नागरिकांची वर्दळ वाढली असल्याने गर्दी करणाऱ्या व प्रकल्पामध्ये पोहणाऱ्या नागरिकांचे जिव धोक्यात आले आहेत. उतावळी धरण १०० टक्‍के भरले असल्याने सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दृष्य पाहून तरुण मुले-मुली आकर्षित होत आहे. उतावळी धरणावरचे निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहेत. सांडव्याच्या खालच्या बाजूला धबधबा असून त्या ठिकाणी खूप प्रमाणात गर्दी दिसत आहे.

देऊळगाव साकर्शाचे तलाठी माने यांनी जानेफळ पोलीस स्टेशन संपर्क करून तातडीने उतावळी प्रकल्पावर झालेल्या गर्दीबाबत माहिती दिली. नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले आपल्या कर्मचाऱ्यांसह हजर झाले असता पर्यटकांची झुंबड उडाली. धरणांमध्ये पोहणाऱ्या व सांडव्यावर मस्ती करणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. या ठिकाणी उतावळी धरणावर चा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. सध्या पावसाने जोरदार हजेरी लावून नदी- नाले तुडुंब भरलेले आहेत. या ठिकाणी जर कमी- जास्त अपघात घडला तर याला जबाबदार कोण? असा एक प्रश्न निर्माण होत आहे.