गणेश राठोड ठरले उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, डॉ. संजय गरकल उत्कृष्ट तहसीलदार; जिल्हाधिकाऱ्यांनी गौरवले
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रशासनात विविध विभाग कार्यरत असतात. कार्यरत विभागांमध्ये महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महसूल विभागाला प्रशासनाचा कणा संबोधले जाते. शासन कुठलीही नवीन योजना आखताना सुद्धा महसूल विभागाला गृहीत धरूनच कार्यवाही करावयास लावते. त्यामुळे विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व सामान्य जनतेशी निगडीत कामे विहित कालावधीत निकाली काढावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२१ या महसूली वर्षामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून एका योद्ध्याप्रमाणे आपात्कालिन परिस्थिती हाताळणी अशा कोविड योद्ध्यांचा सन्मान, गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. चावरिया यांनी महसूल विभाग व पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांनी कोविड 19 करिता अहोरात्र काम केले असल्याने या विभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, मेहकर यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी व डॉ. संजय गरकल यांना तहसीलदार, मेहकर यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांनी अत्यंत साधेपणाने व कोरोना संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने शासनाव्दारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पार पाडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी, वाहनचालक, कोतवाल व पोलीस पाटील उपस्थित होते.