जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुक; उमेदवारी अर्ज फेटाळला तर अपिलाची संधी नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाच अंतिम अधिकार; १९६१ च्या अधिनियमात सुधारणव0
Dec 22, 2025, 14:15 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नगर पालिका निवडणूक संपल्यानंतर आता ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.ज्या जिल्हा परिषदामध्ये ५० टक्क्याच्या आत आरक्षण आहे त्यांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकापूर्वी राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज फेटाळला तर अपीलच करता येणार नाही.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.त्यामुळे अर्ज करताना चूक केल्यास थेट उमेदवारी बाद होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वेळेत आणि कालबद्ध पद्धतीने पार पडाव्यात, या उद्देशाने महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
आतापर्यंत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) स्वीकारणे किंवा नाकारणे याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील करता येत होते. मात्र, विविध जिल्हा न्यायालयांत ही अपीले दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने निवडणूक प्रक्रियेला विलंब होत होता. परिणामी, अनेक ठिकाणी निवडणुका वेळेत घेणे अशक्य होत असल्याची बाब पुढे आली होती.
ही अडचण लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने संबंधित तरतूद वगळण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता उमेदवारी अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम राहणार आहे. तसेच, अशा निवडणुकांबाबत आवश्यक ते नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाला देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक पारदर्शक, गतिमान व वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.