दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्यात युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन; पोलिसांशी झटापट, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी... पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात 

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने बुधवारी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात अर्धनग्न आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट व ओढाताण झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये काही काळ धक्काबुक्की, ओढाताण आणि झटापट झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.या आंदोलनामुळे जयस्तंभ चौक परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक आणि जनजीवन पूर्ववत झाले. युवक काँग्रेसने विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध कायम ठेवत केंद्र सरकारने या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पुन्हा एकदा केली.