तुम्हीच सांगा साहेब ..आम्ही जगांव का मरांव? अमोना येथील शेतकऱ्यांचा आर्त सवाल! 
शेतरस्ता आणि पुलाअभावी शेतकऱ्यांना भोगाव्या लागत आहेत मरण यातना!

 प्रश्न विदर्भाचा की मराठवाड्याचा, यंत्रणा देत आहे उडवाउडवीची उत्तरे...

 

बुलडाणा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) होय.. अमोना येथील शेतकरी पार वैतागले आहेत..जीवावर बेतणाऱ्या मरण यातना त्यांना सोसाव्या लागत आहेत.. जालना जिल्ह्यात येणाऱ्या डोलखेडा प्रकल्पाचे बॅकवॉटर अमोना शिवारात तुंबते..त्यामुळे या भागातील शेती अक्षरशः जलमय होते.. शेतात पाणी की पाण्यात शेती? असा सवाल उपस्थित व्हावा इतपत वाईट अवस्था या भागात झाली आहे.. या भागातील शेतकऱ्यांना , माय माऊल्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागते.. शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले..मात्र हा प्रश्न मराठवाड्याचा की विदर्भाचा यातच प्रशासकीय यंत्रणा कन्फ्युज असल्याचे दुर्दैवी चित्र आहे..

 

 अमोना शिवारातील गट क्रमांक ३३१, ३३७,३२२,३०२ या भागातील शेती प्रामुख्याने यामुळे प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची प्लॉटिंगची शेती आहे, त्यामुळे महिलांना शेतात जावेच लागते..
मात्र नदीत पाण्याचा तुंब एवढा आहे की जीवावर उदार होऊन थर्माकोलच्या साहाय्याने बनवलेल्या होडीतून त्यांना पलीकडच्या काठावर जावे लागते. हा प्रश्न तातडीने सोडवावा, यावर ठोस निर्णय व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आठ दिवसांत ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशारा संदेश ताठे, विजय सुरडकर, प्रवीण वाघ, अनंत वाघ, उद्धव ताटे, दीपक वाघ ,संतोष वाघ, गणेश वाघ, कैलास मोरे, नीता ताटे, नामदेव वाघ यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी दिला आहे...