प्रत्येकी १००० घेतल्याशिवाय निघत नाही पगार! जिल्ह्यातील १५० CHO ची व्यथा; दीड लाख कुणाच्या घशात जातात? बुलडाणा जिल्हा परिषदेतील तो "खादाड" अधिकारी कोण? 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्याला तसा शासनाचा  गलेलठ्ठ पगार मिळतो..प्रवास भत्ता ,निवास भत्ता यासह अनेक सुविधा मिळतात..मात्र तरीही पोट(ढेरी) भरत नाही... मग काय, बिचाऱ्याला पोटाची खळगी भरवण्यासाठी इकडे तिकडे डल्ला मारावा लागतो...त्यात त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याचा दोष तरी काय म्हणा, ढेरीच मोठी म्हटल्यावर भूक मोठी असणारच ना...तर असो..डायरेक्ट सांगतो, नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणाऱ्या बुलढाणा जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याबद्दलच आम्ही बोलत आहोत..हा अधिकारी दर महिन्याला जिल्ह्यातील जवळपास १५० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या(CHO) च्या पगारात वाटा टाकतो..प्रत्येकी १००० मिळाल्याशिवाय समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा मासिक पगारच निघत नाही. एक हजार हा आकडा तसा लहान वाटत असला तरी १५० जणांकडून १००० या हिशोबाने हा आकडा दीड लाखांच्या घरात जातो..एका  समुदाय आरोग्य अधिकाऱ्यानेच स्वतःचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती "बुलडाणा लाइव्ह" ला दिली..

  बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १५८ समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. दरवर्षी या अधिकाऱ्यांच्या कराराचे नूतनीकरण होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चालणारे आरोग्य उपकेंद्र या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालते. १५८ पैकी ४ ते ५ सीएचओ जिल्ह्यातील काही नेत्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना दर महिन्याला १००० द्यावे लागत नाही, मात्र उर्वरित सर्वांनाच स्वतःच्या पगारासाठी १००० जिल्हा कार्यालयात बसलेल्या "त्या" खादाड अधिकाऱ्याला पाठवावे लागतात.

 

 असे होते कलेक्शन...

या खादाड अधिकाऱ्याकडे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे कलेक्ट–कर आहेत. त्यापैकी पवार आणि हिवाळे नावाचे दोघे कलेक्ट–कर सरकारी काम सांभाळतात. तशी त्यांची जबाबदारी कार्यालयात शासनाने  नेमून दिलेले काम करण्याची, मात्र बऱ्याचदा ते दोघे त्या अधिकाऱ्याच्या शासकीय गाडीत जिल्हा दौरा करून कुठे मेळ जमतो ते पाहतात, त्याचे फुटेज देखील पुराव्यानिशी "बुलडाणा लाइव्ह" कडे प्राप्त झाले आहेत. ते दोघे कार्यालय सोडून "संकलनाच्या" दौऱ्यावर असतात तेव्हा त्याची नोंद कार्यालयात कुठेही नसते हे विशेष. आता राहिला विषय कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सीएचओ कडून १००० संकलन करण्याचा.. तर प्रत्येक तालुकास्तरावर एका सीएचओ ने हे प्रत्येकी १००० जमा करायचे, अशी १३ तालुक्यातील ही रक्कम जिल्हा कार्यालयात  बसलेल्या एका राठोड नावाच्या व्यक्तीकडे जाते, अन् त्यानंतर ती रक्कम भुकेने व्याकुळ झालेल्या खादाड अधिकाऱ्याकडे पोहोचते... चर्चा तर अशी आहे की फ्लॅट मध्ये चोप मिळालेला "लफडेबाज" अधिकारी  आणि हा खादाड अधिकारी एकच आहे..हा तर खाण्याचा एक लहान मार्ग आहे..यापेक्षा आणखी बरेच मोठे मार्ग त्या अधिकाऱ्याकडे आहेत.. ते देखील समोर येतीलच...