१४८ पोलीस शिपाई पदांसाठी १५ मार्चला लेखी परीक्षा; पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध
शारीरिक चाचणीत पात्र उमेदवारांसाठी नियोजन; परीक्षेसाठी कडक सूचना; पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती २०२४-२५ प्रक्रियेत पुढील टप्पा म्हणून लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४८ पोलीस शिपाई पदांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पार पडली असून आता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत ११ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
ही लेखी परीक्षा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होणार आहे. पात्र उमेदवारांसाठी प्रवेशपत्र Policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून उमेदवारांनी ते वेळेत डाउनलोड करणे आवश्यक आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने ही परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांकडे मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच प्रवेशपत्रावर नमूद केलेले दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेसाठी लागणारा बॉलपॉईंट पेन आणि लेखन पॅड कार्यालयाकडूनच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने उमेदवारांनी स्वतःकडून पेन, पेन्सिल, खोडरबर किंवा इतर कोणतीही लेखन सामग्री परीक्षा केंद्रावर आणू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा डिव्हाइस, कॅल्क्युलेटर, डिजिटल नोटपॅड, नोट्स पुस्तके, इअरफोन, हिअरिंग डिव्हाइस, स्मार्ट वॉचेस, स्मार्ट आयग्लासेस यांसह कॉपीसाठी वापरता येणारे कोणतेही साहित्य आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
अशा वस्तूंसह आढळलेल्या उमेदवाराला तात्काळ अपात्र ठरवून महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी होणार असल्याने सर्व उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या लेखी परीक्षेदरम्यान जिल्हा पोलीस दलाची गोपनीय यंत्रणा सक्रिय राहणार असून कोणत्याही प्रकारचे प्रलोभन किंवा अमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा पोलीस प्रशासनाने उमेदवारांना केले आहे. तसेच कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.