व्वा क्या बात है! ९५.२२ टक्के निकालासह बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल; चिखली-देऊळगाव राजाची दमदार कामगिरी...! अमरावती चा नंबर शेवटचा...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला असून, बुलढाणा जिल्ह्याने 95.22 टक्के निकालासह अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा उज्ज्वल निकाल लागल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकूण 34,469 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 34,208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 32,575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींची कामगिरी विशेष ठळक ठरली असून मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.
तालुकानिहाय चमकदार कामगिरी..
तालुकानिहाय निकालात देऊळगाव राजा तालुका 98.87 टक्क्यांसह जिल्ह्यात अव्वल ठरला. त्यापाठोपाठ चिखली (98.38%), सिंदखेड राजा (98.09%) आणि बुलढाणा (97.82%) या तालुक्यांनीही उच्च निकाल नोंदवून जिल्ह्याच्या गुणवत्तेत भर घातली. लोणार (96.87%), मेहकर (94.95%) आणि खामगाव (94.89%) यांनी स्थिर व समाधानकारक निकाल दिला.
नांदुरा (91.07%), मलकापूर (91.17%), जळगाव जामोद (93.07%) आणि संग्रामपूर (93.81%) या तालुक्यांनी मध्यम पातळीवरील कामगिरी नोंदवली. मात्र, मोताळा (90.49%) आणि शेगाव (87.55%) या तालुक्यांचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे दिसून आले आहे.
गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्नांची गरज..
कमी निकाल असलेल्या तालुक्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पुढील वर्षात अशा तालुक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून जिल्ह्याचा निकाल आणखी वाढविण्याचा निर्धार शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
अमरावती विभागात बुलढाण्याचा दबदबा..
अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्याने 95.22 टक्क्यांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. वाशिम (91.15%) दुसऱ्या, अकोला (90.14%) तिसऱ्या, यवतमाळ (89.69%) चौथ्या, तर अमरावती (88.26%) जिल्हा शेवटच्या क्रमांकावर राहिला आहे.
एकूणच, बुलढाणा जिल्ह्याचा निकाल शैक्षणिक प्रगतीचा सकारात्मक संकेत देणारा ठरला असून गुणवत्तावाढीचा कल कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.