सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरा गडलिंग येथील शेत रस्त्याचे काम मार्गी ! ज्ञानेश्वर खरात यांच्या आंदोलनाला यश.. 

 

सिंदखेड राजा (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग येथील शेत रस्त्याची वर्क ऑर्डर कित्येक दिवसांपासून निघाली होती. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून वर्क ऑर्डरवर तहसीलदारांची स्वाक्षरी घेणे गरजेचे होते. येथील शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले असताना, ज्ञानेश्वर खरात यांनी असंख्य युवकांसह याविषयी पाठपुरावा केला. दहा दिवसांपासून सतत पाठपुरावा केल्यानेही वर्क ऑर्डरचा प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान, ज्ञानेश्वर खरात यांनी आक्रमक भूमिका घेतली. काल १० जुलै रोजी सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर त्यांनी शेतकरी व इतर सहकारी तरुणांसह ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे वृत्त बुलडाणा लाइव्हने प्रकाशित केले.यांनतर रात्री ९ वाजता तहसीलदार यांनी स्वतः कार्यालयासमोर येवून वर्क ऑर्डरवर स्वाक्षरी केली आणि रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावले.

   काल १० जुलै रोजी हिवरा गडलिंग येथील शेतकरी आणि काही तरुणांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. हिवरा गडलिंग रस्त्याच्या वर्क ऑर्डरवर तहसीलदार सही करत नाही. यामुळे रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची शेतात जाण्यासाठी दैना होत आहे. जोपर्यंत तहसीलदार वर्क ऑर्डरवर सही करणार नाही तोपर्यंत आपण येथून जाणार नसल्याची भूमिका आंदोलक ज्ञानेश्वर खरात यांनी घेतली होती. यासह इतर मागण्यांना घेवून त्यांनी प्रशासनाची लक्ष वेधले. यामध्ये नागरिकांना सन्मानजनक वागणूक मिळावी, तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतरस्त्यांचे वाद मिटविले पाहिजे यामुळे शेकडो शेतकऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी होणे गरजेचे असून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येणे गरजेचे आहे. इतर काही कामांसाठी कोणी लाच मागत असल्यास सोडणार नाही असा इशारा युवकांनी बोलून दाखविला होता.
सतत पाठपुरावा करूनही तहसील प्रशासन शेतकऱ्यांचा विचार करत नसल्याने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा पवित्र घेतला असल्याचे ज्ञानेश्वर खरात म्हणाले. अखेर तहसीलदारांनी रात्री नऊ वाजता हिवरा गडलिंग रस्त्याच्या वर्कऑर्डरवर स्वाक्षरी केली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. आंदोलन करतेवेळी गणेश राजपूत, अजय कऱ्हाडे, संतोष खरात, देविदास मानतकर, विनोद मानतकर, यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.