किरकोळ कारणावरून महिलेवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून लाकडी दांड्याने मारहाण, पतीलाही बेदम मार

 
 मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने घरात घुसून ५२ वर्षीय महिलेवर लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या तिच्या पतीलाही आरोपीने मारहाण केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी बेबी भगवान बगाडे (वय ५२) या २६ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता आपल्या घरात काम करत होत्या. त्यावेळी शेजारी राहणारा संजय भगवान गवई हा त्यांच्या घरात घुसला. किरकोळ कारणावरून वाद घालत त्याने शिवीगाळ सुरू केली आणि हातातील लाकडी दांड्याने बेबी बगाडे यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, पत्नीला मारहाण होत असल्याचे पाहून भगवान बगाडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही मारहाण करून जखमी केले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी बेबी भगवान बगाडे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी संजय भगवान गवई याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.