दबा धरून बसलेल्या रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला! शेतकरी गंभीर; वाढत्या हल्ल्यांवर वनविभाग लक्ष देणार का?
Updated: May 18, 2026, 08:44 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील शेलगाव मुकुंद शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी, १७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव बन्शी म्हस्के (वय ६०) हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. यावेळी शेत परिसरात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे म्हस्के यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. रानडुकराने जोरदार धडक देत त्यांना खाली पाडल्याने ते जखमी झाले.
घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी ज्ञानदेव म्हस्के यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, शेलगाव मुकुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रानडुकरांकडून पिकांचे नुकसान होत असून आता थेट हल्ल्यांच्या घटनाही घडू लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.