ज्यांच खूप कौतुक झालं त्या नायब तहसीलदार अस्मा मुजावर यांची बदली करण्याची का होतेय मागणी? थेट उपोषणाचाच इशारा; "हे"५ तालुके सोडून कुठेही पाठवा...
Updated: Jul 7, 2024, 18:22 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार आस्मा मुजावर यांनी दोन आठवड्यात २ हजार ४०० दाखले दिल्याचे खूप कौतुक होत आहे. अर्थात ते काम चांगले आहेच, यात कुठेही शंका घेण्याचे कारण नाही. मात्र ज्या आस्मा मुजावर यांचे कौतुक होतेय त्यांच्याच बदलीची मागणी समोर येत आहे. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे यांनी मुजावर यांची बदली करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.डॉ. आस्मा मुजावर यादी सुद्धा ४ वर्षे सिंदखेड राजा तहसील मध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांना तालुक्याचा दांडगा अभ्यास आहे, मात्र आधीपासून त्यांचे इथे हितसंबंध तयार झालेले आहेत. अवैध रेती माफियांसोबत त्यांची चांगलीच ओळख आहे. त्यामुळे रेतीमाफीयांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे सिंदखेडराजा, देऊळगाव राजा ,चिखली, मेहकर बुलडाणा हे ५ तालुके सोडून त्यांची कुठेही बदली करा अशी मागणी सरकटे यांनी केली आहे.
बबन सरकटे यांनी २० जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. सिंदखेडराजा तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. आसमा मुजावर याआधी दीड ते दोन वर्ष देऊळगाव राजा येथे सुद्धा कार्यरत होत्या. त्यांचे तालुक्यातील अनेक हितचिंतक आहेत. दरम्यान, अवैध रेतीची वाहतूक, उत्पन्नाचे दाखले, शेतीचे प्रकरण असे कामे त्यांनी हाताळले आहे. त्यांचे रेतीमाफीयांशी संबंध असल्याने कामे चुकीच्या मार्गाने वळणार आहेत. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या तातडीने डॉ. मुजावर यांची बदली करण्यात यावी. अशी मागणी सरकटे यांनी निवेदनातून केली आहे.