दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जिवावर उठले कोण? सोयाबीनच्या सुड्यांना आग लावून लाखोंची राख; दोन घटनांत १.५९ लाखांचे नुकसान!

 चिखली तालुक्यातील अंत्री कोळी आणि रोहडा परिसरात संतापजनक प्रकार; २७ ते २८ क्विंटल सोयाबीन जळून खाक, अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आधीच दुष्काळसदृश परिस्थिती, पावसाची अनिश्चितता आणि शेतीमालाला मिळणाऱ्या भावाची चिंता… अशा संकटांच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता आणखी एका भीषण संकटाची भर पडली आहे. शेतात कष्टाने पिकवलेले सोयाबीन, कापणीनंतर सुड्या रचून ठेवलेले असताना त्याच सुड्यांना आग लावण्याचे संतापजनक प्रकार चिखली तालुक्यात समोर आले आहेत. अंत्री कोळी आणि रोहडा परिसरात घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये तब्बल २७ ते २८ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकऱ्यांचे अंदाजे १ लाख ५९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर राख होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंत्री कोळीत २० क्विंटल सोयाबीन जळाले; शेतकऱ्याचे एक लाख ४० हजारांचे नुकसान

चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथील शेतकरी दिनेश बहादराव काळे यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची कापणी करून त्याची सुडी रचून ठेवली होती. हंगामभर केलेल्या मेहनतीचे फळ हातात येण्याची वेळ असतानाच अज्ञात व्यक्तीने या सुडीला आग लावल्याची घटना २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

या आगीत संपूर्ण सुडी जळून खाक झाली. परिणामी, सुमारे २० क्विंटल सोयाबीनचे नुकसान झाले असून, बाजारभावानुसार त्याची किंमत अंदाजे १ लाख ४० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.एकीकडे शेतीचा वाढता खर्च, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून पीक हाताशी आलेले असताना घडलेल्या या प्रकाराने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेनंतर दिनेश काळे यांनी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रोहड्यात सात ते आठ क्विंटल सोयाबीन खाक; १९ हजारांचे नुकसान

दुसरी घटना चिखली तालुक्यातील रोहडा येथे घडली. येथील शेतकरी समीर शेख अजिज (वय ४३) यांनी त्यांच्या गट क्रमांक २८२ मधील शेतात सोयाबीनची गंजी रचून ठेवली होती. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावल्याची तक्रार करण्यात आली आहे.या आगीत सात ते आठ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. त्यामुळे अंदाजे १९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी समीर शेख अजिज यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि अपेक्षित उत्पन्नाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगी अपघाताने लागल्या की जाणीवपूर्वक लावण्यात आल्या, याचा तपास पोलिसांकडून होणे महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच रोखणार कोण?

शेतकऱ्यांसाठी पीक म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नसते, तर संपूर्ण कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा असते. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीसाठी केलेला खर्च वसूल होण्याची अपेक्षा सोयाबीनच्या सुड्यांवर असते. अशा परिस्थितीत शेतातील उभे पीक किंवा कापणीनंतर साठवून ठेवलेले सोयाबीन जाळण्याचा प्रकार घडल्यास शेतकऱ्याचे आर्थिक गणितच कोलमडते.
आधीच प्रतिकूल हवामान आणि शेतीतील अनिश्चिततेने शेतकरी त्रस्त असताना, अशा घटनांमुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे. जर या घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्या असतील, तर हा केवळ मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रकार नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणारी गंभीर बाब आहे.

पोलिस तपासाकडे लक्ष; आरोपींचा शोध घेण्याची मागणी

अंत्री कोळी येथील घटनेचा तपास रायपूर पोलीस ठाण्याकडून, तर रोहडा येथील घटनेचा तपास अंढेरा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. ठाणेदार नीलेश सोंळंके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार तथा पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ शितोळे पुढील तपास करीत असल्याचे वृत्तात नमूद आहे.

या घटनांमागील नेमके कारण काय, आग लावणाऱ्या व्यक्ती कोण आणि शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यामागे काही वैयक्तिक वैर आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होतील. पोलिसांनी घटनांचा गांभीर्याने तपास करून दोषींना शोधावे आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या घामातून उभे राहिलेले पीक जाळण्याचे प्रकार खरेच जाणीवपूर्वक घडवले जात असतील, तर अशा कृत्यांना कोणतीही माफी असू शकत नाही. संकटांनी आधीच घेरलेल्या बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करणे, ही आता अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.